Satara | आमदारांना पराभूत करण्यास शिवसैनिक मैदानात

खंडाळा, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या ५६ लाख रुपये विकास कामासाठी महायुतीत असलेल्या आ. मकरंद पाटील यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता,
श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व शासकीय यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्या आमच्याच महायुतीच्या आमदाराविरोधात आम्ही शिवसैनिक व मित्र पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत.
यापुढील काळात आमदारांच्या बगलबच्चांनी आमच्या नादी लागू नये अन्यथा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक जशास तसे उत्तर देईल, असा इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेच्या सांगता सभेत ते बोलत होते.
यावेळी संजयसिंह देशमुख, भूषण शिंदे, बाळासाहेब जाधव, उमेश बोडरे, विजय चव्हाण, लक्ष्मण तात्या जाधव, गणेश जाधव, योगेश भैया परदेशी, संदीप चव्हाण, सचिन देशमाने, सनी भंडलकर, सुनील बोडरे, अभिजित बोडरे, प्रशांत वायदंडे, नौशाद शेख व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते लोणंद शहरातील ५६ लाख रुपये खर्च खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना महाबळेश्वर संघटक संजयसिंह देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाई मतदारसंघासाठी कोट्यवधीचा निधी दिला.
मात्र, हा निधी मी आणला असल्याचा खोटा आव आमदार आणत आहेत. शिवसेना खंडाळा तालुकाप्रमुख भूषण शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीचा धर्म पाळून काम करीत आहोत, मात्र आमदार मकरंद पाटील यांनी विरोध करण्याचे तंत्र राबवल्यामुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
दरम्यान, ३ ऑक्टोबरपासून क्षेत्र महाबळेश्वर येथून सुरू झालेली जनसंवाद यात्रा महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातून १३८ गावांत पोचली. पुरुषोत्तम जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली. या यात्रेचा समारोप खंडाळा येथे करण्यात आला.
जाधव यांची यात्रा पोचली १३८ गावांत
वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील १३८ गावांत व वाडीवस्तीवर प्रत्यक्ष जाऊन नागरिक, महिलांचे प्रश्न जाणून घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे व विविध योजनांची माहिती जाधव यांनी सर्वांना दिली. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भगवे वादळ वाई खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात पाहायला मिळाले.





