सातारा, (प्रतिनिधी) – शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी जिल्हाप्रमुख पदास सह शिवसेना सदस्यत्वचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या मातृभूमीतील मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखाने राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीत हा चर्चेचा विषय झाला आहे . आता पुरुषोत्तम जाधव अपक्ष रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले आहे. जाधव यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्ष युतीच्या नावाखाली सातारा लोकसभा व वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ मित्र पक्षाला बहाल केला जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारसरणीच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीची वारंवार तयारी करून देखील लढण्याची संधी डावलली जात आहे. त्यामुळे सोबतच्या शिवसैनिकांचे आणि मतदारांचे सातत्याने खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पद व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. राजीनामामुळे शिवसैनिकांमध्ये तसेच मतदारसंघात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यापुढे पुरुषोत्तम जाधव निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष लढणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात लढण्याची तयारी चालवली होती. परंतु, त्यांनी राजीनामा सचिव मोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.