Satara | खंडाळ्याच्या अस्मितेसाठी पुरुषोत्तम जाधवांनी थोपटले दंड

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी पूर्ण ताकदीने दंड थोपटले आहेत.
वाई तालुक्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेनेला मिळावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपामुळे साताऱ्या जिल्ह्याची शिवसेनेची ताकद आहे.
मात्र, जागा वाटपाच्या तडजोडीत शिवसैनिकांच्या इच्छांना चिरडले गेल्यास प्रसंगी संघर्षाची भूमिका घेऊ, अशी भूमिका पुरुषोत्तम जाधव यांनी स्वीकारली आहे.
गेल्या १५ वर्षापासून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी खंडाळा तालुक्याची ताकद वेळोवेळी दाखवून दिलेली आहे.
2009 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सव्वा लाखापेक्षा अधिक मते घेतली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा एक लाख 55 हजार मते घेतली होती.
त्यानंतर गेल्या दहा वर्षात विधानसभा निवडणुकांच्या संदर्भाने महायुतीच्या नेत्यांनी त्यांना जागा वाटपाच्या तडजोडीत माघार घेण्यास भाग पाडले तरीसुद्धा पुरुषोत्तम जाधव यांनी आपली गटबांधणी सुरू ठेवली होती.
अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. त्यावेळेला शिंदे गटाच्या नेतृत्वाची जिल्ह्याची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्या खांद्यावर आली.
त्यावेळी सदस्य नोंदणी अभियानामध्ये अडीच हजारांहून अधिक शिवसैनिकांची नोंद करत पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे गटाची दखल घेण्यास भाग पाडले.
मात्र, तडजोडीच्या राजकारणामध्ये वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला सातत्याने डावलले जात असल्याची भावना झाल्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात उघड उघड बंड पुकारले आहे .
खंडाळा तालुक्याची लोकसंख्या एक लाख वीस हजार इतकी आहे. मात्र, आजपर्यंत गेल्या तीन दशकांमध्ये खंडाळा तालुक्याचा पाणी प्रश्न तसेच रोजगार निर्मितीचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत.
विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी आजपर्यंत खंडाळा तालुक्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दरासंदर्भात प्रचंड नाराजी असून सत्तेची सर्व पदे एकाच घरात असल्याची खदखद आहे.
जनसंवाद यात्रेला प्रतिसाद
वाई मतदारसंघात खंडाळा तालुक्याकडे आ. मकरंद पाटील यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पुरुषोत्तम जाधव यांनी विरोधाचे दंड थोपटले आहेत.प्रसंगी अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी केली असून त्यांनी काढलेली जनसंवाद यात्रा 138 गावांमधून वातावरण निर्मिती करून गेली आहे.
या महाबळेश्वर वाई खंडाळा या तीन तालुक्यात या यात्रेस प्रतिसाद मिळाल्याचा दावा पुरुषोत्तम जाधव समर्थकांनी केला आहे.
तीन तालुक्यांमध्ये पुरुषोत्तम जाधव यांची असणारी पकड कार्यकर्त्यांचे जाळे तसेच विकास कामांसाठी असलेली वचनबद्धता हे लक्षात घेऊन यंदा परिवर्तन घडवायचेच असाचंद बांधून पुरुषोत्तम जाधव रणांगणात उतरले आहेत.
शिवसैनिकांचे भक्कम जाळे पाठीशी
वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाची मतदान संख्या तीन लाख 49 हजार इतकी आहे .त्यामध्ये खंडाळा तालुका सव्वा लाख इतका आहे. त्यामुळे तेथून आपल्याला चांगला पाठिंबा मिळेल आणि तोच आपल्यासाठी निर्णय असेल असा पुरुषोत्तम जाधव यांचा विश्वास आहे.
शिवसैनिकांचे भक्कम जाळे आपल्या पाठीशी आहे. मात्र, त्यांनाच महायुतीच्या तडजोडीत शिवसैनिकांना डावलण्याचे काम होत असेल तर संघर्ष करण्याची भूमिका घेऊ शिवसेना नेते स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही समर्थक आहोत. त्यामुळे शिवसैनिकांना डावलू नका अन्यथा ताकत दाखवू, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.





