इमेज बदलायचीय

बॉलीवूडच्या ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना स्वतःला सिद्ध करताना, सुपरहिट होताना आणि इंडस्ट्रीत टिकून राहताना आणखी एक व्यवधान आवर्जून पाळावे लागते ते म्हणजे साच्यात न अडकण्याचे.
एकसारख्या व्यक्तिरेखा साकारून किंवा एकाच धाटणीचे चित्रपट करुन कलाकारांवर छाप पडण्याचा धोका असतो. इमरान हाश्मीचेच उदाहरण घ्या. बॉलीवूडचा सिरियल किलर अशी ओळख झालेल्या इमरानला सध्या अशाच साच्यातून बाहेर यायचे आहे.
तो म्हणतो की, का कुणास ठाऊक पण प्रेक्षकांना नेहमीच असे वाटते की मी गॅंगस्टर किंवा खलनायकाचीच व्यक्तिरेखा निभावावी. वास्तविक, मला या इमेजमधून बाहेर यायचे आहे. यासाठी एका दमदार पटकथेच्या शोधात मी आहे.
इमरान हाश्मीने 2000 च्या दशकामध्ये आलेल्या “गॅंगस्टर’, “जन्नत’, “वो लम्हे’, “वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ यांसह अन्यही काही हिट चित्रपट दिले आहेत. 40 वर्षीय इमरान आता “द बॉडी’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात त्याने पत्नीच्या खुनाचा आरोप असलेल्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे.





