Chandrashekhar Bawankule : “उद्धवसेनेला राऊतांमुळेच फटका”; बावनकुळेंचा खोचक टोला

Chandrashekhar Bawankule – उद्धवसेनेला संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे फटका बसत असल्याचे मत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, संजय राऊत दररोज बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, हे सर्वांना माहिती आहे.
ते कमी बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढल्या असत्या. मात्र सततच्या बोलण्याने त्यांच्या जागा कमी होत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षात कोणाला नेता मानायचे हे ठरविले पाहिजे. त्यांना भाजप आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार नाही, असे देखील बावनकुळेंनी राऊतांना सुनावले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ व सक्षम आहेत. यापूर्वी अनेकांनी ८१-८२ वयापर्यंत काम केले आहे. ते २०२९ पर्यंत आमचे पंतप्रधान आहेतच. संजय राऊत यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल ईर्ष्या आहे. कारण यांची सर्व दुकाने त्यांच्यामुळे बंद झाली आहे.
सभागृहात दाखविण्यात आलेला पेन ड्राईव्हमध्ये भाजप नेत्यांची नावे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मात्र त्या सर्व शिळ्या भाकऱ्या आहे. मीडियामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते बोलत असतात. त्यांनी २०२५ बाबत बोलले पाहिजे, असे देखील बावनकुळे म्हणाले.





