Chandrashekhar Bawankule : भोंदूबाबा खरात प्रकरणात ‘त्या’ चार मंत्र्यांचा संबंध? महसूलमंत्री बावनकुळेंचा पटोलेंना ओपन चॅलेंज..म्हणाले
Chandrashekhar Bawankule : "मुख्यमंत्र्यांकडे नावे पाठवण्याऐवजी ती जाहीर करून मोठी बातमी द्या"; बावनकुळेंचा पटोलेंना टोला, रुपाली चाकणकर यांच्या चौकशीवरही स्पष्टीकरण.

Chandrashekhar Bawankule – काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडे धमक असेल तर त्यांनी भोंदूबाबा खरात प्रकरणाशी संबंधित चार मंत्र्यांची नावे तातडीने जाहीर करावीत, असे आव्हान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. खरात पोलीस कोठडीत सुरक्षित असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही. त्यामुळे पटोले यांनी न घाबरता ही नावे समोर आणावीत, असेही ते म्हणाले.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की नाना पटोले केवळ सवंग प्रसिद्धीसाठी मंत्र्यांचे नाव न घेता आरोप करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नावे पाठवण्याऐवजी ती जाहीर करून मोठी बातमी द्यावी. याच प्रकरणात रूपाली चाकणकर यांची होणारी चौकशी हा केवळ तपासाचा एक भाग असून, पोलीस योग्यवेळी भूमिका मांडतील.
नसरापूर घटनेवर ते म्हणाले, आरोपीला संविधानानुसार रस्त्यावर फाशी देता येत नाही. मात्र, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत. निदा खान अटक आणि धर्मांतर प्रकरणाची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली असून पोलीस लवकरच सविस्तर तपशील जाहीर करतील.
लँड टायटलिंग ॲक्ट
जुलै महिन्यापासून महाराष्ट्र सरकार लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणार आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालमत्तेला कायदेशीर निश्चितता मिळेल. प्रॉपर्टी कार्ड हा देशातील कोणत्याही न्यायालयात अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल, ज्यामुळे मालमत्तेचे व्यवहार अधिक पारदर्शक, सुलभ होतील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.





