Chandrashekhar Bawankule – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-2047’चा संकल्प करण्यात आला असून, ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे, सरपंच सुप्रिया कंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाच्या त्रिसूत्रीवर आधारित हे अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरात सुमारे 20 गावांचा समावेश असून विविध विभागांच्या 45 सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हवेली तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वतंत्र ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ही योजना राज्यभर राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. लोणीकंद ः येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. या योजनेद्वारे पुढील पाच वर्षांत शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान महसूल विभागाचा आकृतिबंध मंजूर केल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकार्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महसुली सेवांची माहिती देणार्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध शासकीय स्टॉलना भेट देत माहिती घेतली. महसूल विभाग ‘शासनाचा कणा’ महसूल विभाग हा शासनाचा कणा असून नागरिकांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या विविध कागदपत्रांशी तो निगडित आहे. आपत्तीच्या काळातही हा विभाग इतर यंत्रणांसोबत समन्वय साधून नागरिकांना दिलासा देतो. त्यामुळे नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी विभागाकडून विविध लोकाभिमुख निर्णय घेतले जात असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. पाणंद रस्ता योजना गतीत हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेची कामे वेगाने सुरू असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातून ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महसूल विभागाच्या सेवांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी सांगितले.