‘व्हू इज धंगेकर’ म्हणणारे चंद्रकांत पाटलांच धंगेकरांच्या पक्ष प्रवेशावर मोठं विधान; म्हणाले “भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला असता तर….”

पुणेः कसबा विधानसभेचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ज्या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर त्यांनी विधानसभा लढवली होती आणि पोटनिवडणूकीत हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्याची बरीच चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र धंगेकर यांच्या वाट्याला पराभव आला.
तरीही त्यांनी विविध आंदोलन आणि आपली आक्रमक शैेली कायम ठेवली होती. त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच पोटनिवडणुकीत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटीलांच व्हू इज धंगेकर हे विधान चर्चेत राहिले होते. आता धंगेकर महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता, तर मग मी त्या विरोधात भांडलो असतो, असे विधान त्यांनी केले आहे. कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचे स्वातंत्र्य त्या त्या पक्षाला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच धंगेकर यांच्यासोबत आमचा नुसता पंगा नाही. तर आम्ही एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. एकदा हरलो पण त्यांना दोनदा हरवल, राजकारण आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट ही काळच्या ओघात बदलत असते, याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत, असे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
एकनाथ शिंदेंना वाटलं असावं म्हणून….
एकनाथ शिंदे यांना वाटलं असावं की, पुण्यामध्ये काम वाढवायचे आहे त्या हेतूने कदाचित त्यांनी धंगेकरांना घेतले असावे. ते आता आमच्या सहयोगी पक्षाचे सदस्य झालेले आहेत. कार्यकर्ता हा त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणार, एवढं तरी आमच्या पक्षात स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आता संघर्ष होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
पुणे भाजपमध्ये नाराजीचा सूर?
धंगेकर हे काँग्रेस पक्षात असताना त्यांनी पुणे शहरात विविध आंदोलने केली. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक वेळा टीका देखील केली. त्यामुळे आता धंगेकर शिवसेनेत म्हणजेच महायुतीमध्ये आल्याने पुणे शहर भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.





