Chandrakant Patil : 2019 च्या सत्तास्थापनेवरून चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सतेज पाटलांवर जोरदार हल्लाबोल
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निकालानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील (बंटी पाटील) यांच्याकडून महायुतीवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrakant Patil : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निकालानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील (बंटी पाटील) यांच्याकडून महायुतीवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेला भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
शिरगाव येथील गोकुळ चौकात महायुतीतर्फे आयोजित जाहीर सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर राजकीय कारकीर्दीतील सर्वात घणाघाती टीका केली. “खेळणं न मिळाल्यावर लहान मूल जसा त्रागा करतं, तसंच गोकुळचे अध्यक्षपद न मिळाल्याने बंटी पाटील यांची अवस्था झाली आहे. ते नावाप्रमाणे बंटीच राहिले, कधी बंटीसाहेब झालेच नाहीत,” असा टोला त्यांनी (Chandrakant Patil) लगावला.
लहान मुलासारखा त्रागा आणि खोटी नरेटिव्ह
सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, गोकुळचा निकाल लागल्यापासून गेल्या १५ दिवसांत बंटी पाटील यांनी केवळ महायुतीला शिव्या देणे आणि खोटे नरेटिव्ह पसरवण्याचे काम केले आहे. “एखाद्या लहान मुलाला हवं ते खेळणं मिळालं नाही की ते हातपाय आपटतं, आईला बोचकारतं; तसंच बंटी पाटील गोकुळचं अध्यक्षपद गेलं म्हणून मला, मुश्रीफांना बोचकारत आहेत.
धनंजय महाडिक हे खासदार असल्याने आम्ही त्यांना आदराने मुन्ना साहेब म्हणतो, पण बंटी पाटील विरोधक असले तरी त्यांना ‘साहेब’ म्हणावं अशी त्यांची समज राहिलेली नाही. ते बंटीच राहिले,” अशी खिल्ली त्यांनी उडवली. महाविकास आघाडी म्हणजे केवळ बंटी पाटील अशी स्थिती असून त्यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट) कुठेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकशाही शिकवण्याचा अधिकार नाही: आणीबाणीची आठवण
गोकुळच्या निवडणुकीत लोकशाही पायदळी तुडवल्याच्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी आकडेवारी मांडली. ते म्हणाले, “गोकुळ निवडणुकीत तुमचे १३ संचालक आले आणि ४९०० मते मिळाली, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आणि आम्हाला ५१०० मते मिळाली. ज्या काँग्रेस पक्षाने आणीबाणी लावून २० लाख लोकांना तुरुंगात टाकले, बोलण्या-लिहिण्यावर बंदी घातली, त्या पक्षाचे नेते आज आम्हाला लोकशाही शिकवणार का?” असा परखड सवाल त्यांनी केला.
२०१९ मधील सत्तास्थापनेचा मोठा गौप्यस्फोट
२०१९ च्या विधानसभा निकालानंतरच्या घडामोडींवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले. २०१९ मध्ये महायुतीला १६६ जागांचे स्पष्ट बहुमत मिळाले होते, मात्र सतेज पाटील यांनी शरद पवारांच्या साथीने जयपूरला जाऊन सोनिया गांधींवर दबाव आणला. “शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली नाही तर ४० आमदारांचा गट फोडू, अशी धमकी सतेज पाटलांनी सोनिया गांधींना दिली होती. सोनिया गांधींशी झालेल्या त्या व्हिडिओ कॉलची आणि संभाषणाची मला पूर्ण माहिती असून वेळ आल्यास मी कॉल रेकॉर्ड्सही समोर आणीन,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड फेकू नयेत’
आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी सतेज पाटील यांना थेट इशारा दिला. “आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी टोकले तर सोडत नाही. स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. इतकी अमाप संपत्ती कुठून आली? केवळ मलई खाण्यासाठी आणि मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी गोकुळची सत्ता हवी आहे. त्यामुळे स्वतःची वैचारिक उंची ओळखून बोलावे,” असा घणाघात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला.






