Chandrakant Patil: गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास
Chandrakant Patil:

Chandrakant Patil:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोने प्रवास केला.
शहरातील गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिकांची मोठी गर्दी रस्त्यावर पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत वेळ वाचवण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा सामना टाळण्यासाठी पाटील यांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडला.
गणेशोत्सव काळात पुण्याच्या मध्यवर्ती भागात विविध गणेश मंडळांचे देखावे, मिरवणुका आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होते. त्यातच काही प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध आणि नो-पार्किंगचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोने प्रवास करत नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा संदेश दिला. गणेशोत्सवात मेट्रोला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, काही दिवसांतच लाखो प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आहे. महामेट्रोच्या माहितीनुसार, गणेशोत्सवातील सलग सुट्ट्यांमध्ये आठ लाखांहून अधिक भाविकांनी मेट्रोने प्रवास केला.
गणेशोत्सवाच्या गर्दीचा विचार करून पुणे मेट्रोने यंदा विशेष नियोजन केले आहे. गर्दीच्या काळात फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यात आली असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशीही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष सेवा देण्यात येत आहे.
दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मिरवणुकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल करण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रो, बस यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात मेट्रो हा शहरातील प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय ठरत असल्याचे चित्र आहे.





