चंदीगडचे महापौर पद अखेर भाजपकडेच ;कॉंग्रेस, व अकालीदलाचा निवडणुकीवर बहिष्कार

चंदीगड – चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. तथापि ही महापालिका त्रिशंकु राहिली होती. त्यामुळे या महापालिकेत कोणाला महापौरपद मिळणार या विषयी मोठेच औत्स्युक्य निर्माण झाले होते. पण एका मताने भाजपने हे पद मिळवले. भाजपच्या सरबजीत कौर या चंदीगडच्या नवीन महापौर झाल्या आहेत.
महापालिकेत एकूण 36 जागा आहेत. त्यातील 28 जणांनी मतदानात भाग घेतला. कॉंग्रेस व शिरोमणी अकालीदलाने या निवडणुकीच्या मतदानात भाग घेतला नाही. कौर यांना 14 मते मिळाली तर आम आदमी पक्षाच्या अंजू कट्याल यांना 13 मते मिळाली. एक मत अवैध ठरवण्यात आले. हा निकाल जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात मोठाच गोंधळ घातला. शेवटी पोलिस बोलावून त्यांना बाहेर काढण्यात आले.
महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला 14, भारतीय जनता पक्षाला 12 जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला आठ तर शिरोमणी अकाली दलाला एक जागा मिळाली होती. कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेल्या हरप्रित कौर बादल यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपच्या जागा 13 झाल्या होत्या. या महापालिकेत चंदीगडच्या खासदारालाहीं एक मत देण्याचा अधिकार आहे. तेथे भाजपचा खासदार असल्याने हे मत भाजपला पडले.





