चाकण-शिक्रापूर रस्ता ब्लॉक; तब्बल 20 किमी वाहनांच्या रांगा

शेलपिंपळगाव – रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी भावाकडे जात असते मात्र याच बहिणींना आपल्या भावाकडे जाण्यासाठी तब्बल 20किलोमीटर वाहतूक कोंडीचा सामना करत राखी बांधण्यासाठी पोहोचावे लागले. ही संपूर्ण स्थिती चाकण शिक्रापूर रस्त्यावर सोमवारी (दि. 19) दिवसभर अनुभवायला मिळाली.
चाकण शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव शेलगाव, भोसे, रासे, मोहितेवाडी बहुळ, साबळेवाडी आणि शिरूर तालुक्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करत नागरिकांना मार्गस्थ व्हावे लागत होते. दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ न ही पोलीस प्रशासन रस्त्यावर नसल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती याचा फटका बहिणींसह या रस्त्यावरून वाहतूक करणार्या चालकांना सहन करावा लागला.
चाकण शिक्रापूर रस्त्यावरून प्रवास करताना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत चाकण शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येतात; मात्र इतर गावच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यासाठी उशीर का होतो, असा सवालच प्रवाशांनी प्रशासनाला विचारला आहे.





