पुणे जिल्हा | चाकण-शिक्रापूर महामार्ग खड्ड्यांत

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – चाकण-शिक्रापूर रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डा अशी काहीशी परिस्थिती या राज्य महामार्गावरती झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दिवसाला चार ते पाच छोटे-मोठे अपघात घडले आहेत.
गेले कित्येक दिवसांपासून पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना आणि दुचाकी चालकांना मोठी दुखापतही झाली आहे तरीही हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा जागी होत नाही. या खड्ड्यांमुळे फक्त अपघातात होत नाहीये तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.
शेलगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील सह्याद्री आणि जयहरी हॉटेलच्या समोर गेले कित्येक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्र देण्यात आले आहे; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या पत्राला केराची टोपली दाखवली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे हा रस्ता मुंबईकडून अहमदनगर आणि पुढे मराठवाड्याकडे जाणारी जड वाहतूक याच मार्गाने मार्गस्थ होत असते. तर तळेगाव दाभाडे, चाकण आणि रांजणगाव या औद्योगिक वसाहतींना जोडणारा हाच एकमेव दुवा आहे.
मात्र याच रस्त्याची रासे, भोसे, शेलगांव, शेलपिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने सरपंच शरद मोहिते, खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष आवटे,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल झरेकर, सरपंच परिषदेचे शशिकांत मोरे, सदस्य राहुल आवटे, प्रीतम आवटे, रोहित आवटे, चेअरमन संभाजी दौडकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी गांधीगिरी मार्गाने रस्ता बंद करण्याचा इशाराच प्रशासनाला दिला आहे.
चाकण शिक्रापूर रस्त्यावरील ग्रामपंचायत शेलगाव हद्दीतील सह्याद्री हॉटेल समोरील मोरीचा पाइप फुटल्याने ती मोरी बंद झाली आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत याविषयी आणि गावातील इतर ठिकाणच्या खड्ड्यांविषयी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे तरीही अधिकार्यांना जाग येणार नसेल तर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
– वैशाली आवटे, सरपंच, शेलगाव शेलगाव : शिक्रापूर-चाकण राज्यमहामार्गाची झालेली चाळण.





