Talegaon Chakan Highway : चाकणची वाहतूक कोंडी फुटणार! तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
Talegaon Chakan Highway : तळेगाव ते चाकण दरम्यान जमिनीला समांतर आणि उन्नत असा दुहेरी महामार्ग; चाकण-शिक्रापूर मार्गही होणार चारपदरी.

Talegaon Chakan Highway – जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण महामार्गावर चारपदरी उन्नत आणि चारपदरी जमिनीस समांतर महामार्ग, तसेच चाकण ते शिक्रापूरदरम्यान चार पदरी जमिनीस समांतर महामार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते. बैठकीत सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले. हा महामार्ग डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने विकसित केला जाणार आहे.





