MLA Babaji Kale : खेडच्या विकासासाठी मंत्र्यांचे उंबरठे झिजवणार; विरोधकांचे आरोप खोटारडे – आमदार बाबाजी काळे
MLA Babaji Kale : चाकण-तळेगाव-शिक्रापूर रस्त्यासाठी ३३०० कोटी मंजूर; मागील १५ वर्षांत मागे पडलेला तालुका ५ वर्षांत पुढे नेण्याचा आमदारांचा संकल्प.

MLA Babaji Kale – मी जरी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी सरकार हे जनतेचे आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही पक्षाच्या मंत्र्यांकडे जाऊन निधी आणणे ही माझी जबाबदारी असून, त्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही, असे ठाम प्रतिपादन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले. शनिवारी (दि. २५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत त्यांचा खरपूस समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, पंचायत समिती उपसभापती मंगेश सावंत, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे,
जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे, दिप्ती भोगाडे, विनया मुंगसे, तनुजा घनवट, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या प्रदेश उपाध्यक्षा ॲड.राजमाला बुट्टे पाटील, ज्योती अरगडे, जीवन खराबी, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, अशोक राक्षे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार काळे यांनी चाकण येथील अप्पर तहसील कार्यालय आणि विकासकामांवरून होणारी टीका फेटाळून लावली.
चाकण-तळेगाव-शिक्रापूर रस्त्यासाठी ३३०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला असून, पीएमआरडीएच्या माध्यमातून १०० कोटींचा निधी विविध रस्त्यांसाठी आणल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार काळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, मागील १५ वर्षांत मागे पडलेला तालुका पुढील ५ वर्षांत पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे. त्यांनी माजी आमदार मोहिते पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत, जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना येणाऱ्या काळात परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्यासोबतच्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग ऐकवून विरोधकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणांची माहिती देत आपण जनतेच्या कामासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अॅड. काळे यांनी प्रत्रकार परिषदेत मुंबई उच्च न्यायालय दाखल असलेल्या खटल्याबाबत माहिती दिली.
“भामा-आसखेड धरणाचं पाणी पुण्याला वळवताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, ही बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी शहराकडे देताना पारदर्शकता ठेवली गेली नाही. याहूनही दुर्दैवी म्हणजे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन आजही पूर्ण झालेलं नाही. माजी आमदारांना हे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयश आले आहे.”
– बाबाजी काळे, आमदार, खेड





