Chakan News: चाकण नगरपरिषदेची मोठी कारवाई! मोठ्या अनधिकृत बांधकामांवर फिरवला बुलडोझर
Chakan News: परवानगीशिवाय बांधकाम नियमित होणार नाही; फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत भूखंड न खरेदी करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन.

Chakan News – चाकण शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात चाकण नगरपरिषदेने बुधवारी धडक कारवाई करीत तीन अनधिकृत बांधकामांचे निष्कासन केले. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये ही कारवाई करण्यात आली. नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामधारकांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना सुनावणीची अंतिम संधीही देण्यात आली होती. मात्र, नोटीस बजावून तसेच सुनावणीची संधी देऊनही संबंधितांनी अनधिकृत बांधकामे न हटवल्याने नगरपरिषदेने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करीत निष्कासनाची कारवाई केली. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी नगरपरिषदेने यापूर्वी अनधिकृत जाहिरात फलक,
अनधिकृत अभिन्यास व भूखंड विभागणी तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणांविरोधात तीन टप्प्यांत कारवाई केली आहे. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी अनधिकृत भूखंड खरेदी करू नयेत तसेच नगरपरिषदेची बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय बांधकाम करू नये, याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांमुळे शहर नियोजन, वाहतूक, अग्निसुरक्षा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
काही ठिकाणी बांधकाम परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर खोल्या उभारून त्या भाड्याने दिल्या जात आहेत. आवश्यक पुढील, बाजूची व मागील मोकळी जागा न सोडणे, वाहनतळासाठी जागा न ठेवता निवासी व व्यावसायिक वापरासाठी बांधकाम करणे तसेच उपलब्ध जागेचा नियमबाह्य पद्धतीने अतिवापर करून अतिघनता निर्माण करणे, अशा प्रकारच्या अनियमितता आढळत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या प्रकारामुळे भविष्यात वाहतूक कोंडी, वाहनतळाचा प्रश्न, अग्निशमन वाहनांना होणारा अडथळा तसेच पाणीपुरवठा व मलनिस्सारणासह अन्य नागरी सुविधांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या कारवाईसाठी नगरपरिषदेचे 20 अधिकारी व 50 कर्मचारी, 10 पोलीस अधिकारी व 80 पोलीस कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे सात जवान तैनात करण्यात आले होते.
कारवाईदरम्यान तीन जेसीबी, सहा पोकलेन, सहा ट्रॅक्टर-कटर, सहा चित्रिकरण करणारे कर्मचारी, अग्निशमन बंब, ट्रेलर आणि अन्य आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. कारवाईविरोधात काही संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयीन आदेश तसेच लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.
परवानगीशिवाय बांधकाम करू नका
नगरपरिषदेची मंजुरी नसलेले बांधकाम आपोआप नियमित होत नाही. लागू कायदे व नियमांनुसार पात्रता असल्यास शासनाच्या प्रचलित तरतुदींनुसार प्रशमन शुल्क किंवा दंड भरून नियमितीकरणाची प्रक्रिया करता येऊ शकते. मात्र, प्रत्येक अनधिकृत बांधकाम नियमित होईलच असे नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परवानगीशिवाय बांधकाम करू नका, अनधिकृत भूखंड खरेदी करू नका आणि फसवणुकीपासून सावध राहा, असे आवाहन चाकण नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.






