Chakan MIDC: “फक्त मंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच जाग येते का?” ५ मिनिटांच्या पावसाने उघड पाडली निकृष्ट कामाची पोल
Chakan MIDC: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या चाकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अहोरात्र काम; ५ ते १० मिनिटांच्या पावसाने उघड पाडली डांबरीकरणाची पोलखोल.

Chakan MIDC – चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा चाकण दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून अहोरात्र सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, आज दुपारी फक्त पाच ते दहा मिनिटांच्या पावसामध्ये हा रस्ताच वाहून गेला आहे.
उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्याची चाहूल लागताच रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असला, तरी गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि खड्ड्यांचा सामना करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा आवाज शासनापर्यंत का पोहोचत नाही?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी आणि कामगारांसाठी रोजचीच समस्या बनली आहे. या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. दरम्यान, चाकण एमआयडीसीतील काही कंपन्या स्थलांतरित होण्याच्या चर्चेनंतर शासन आणि प्रशासनाची यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री चाकणमध्ये येत असताना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची लगबग सुरू झाली आहे. उद्योग आणि कंपन्यांच्या समस्या शासनाला महत्त्वाच्या आहेतच; मात्र याच परिसरात वर्षानुवर्षे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासनाला वेळ कधी मिळणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. उद्योगांना आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहेच; परंतु त्याचबरोबर स्थानिक नागरिकांसाठी चांगले रस्ते,
सुरळीत वाहतूक आणि सुरक्षित प्रवास यासाठीही कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. केवळ एखादा मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर येणार म्हणून रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. चाकणच्या नागरिकांना आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष आणि ठोस उपाययोजना हव्या आहेत.






