“चहलकडे दुर्लक्ष नको, मोठ्या स्पर्धेत त्यालाच संधी दिली जात नाही’ – सौरव गांगुली

कोलकाता -भारतात यंदा होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघात लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलचा समावेश केलाच पाहिजे, असे आग्रही मत माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. तो सातत्याने सरस कामगिरी करत आहे मात्र, मोठ्या स्पर्धेत त्यालाच संधी दिली जात नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असेही गांगुली म्हणाला.
आजच्या काळातील क्रिकेट पाहिले तर कोणत्याही संघाकडे शेन वॉर्न, अनील कुंबळेसारखे स्टार लेग स्पीन गोलंदाज नाहीत. चहलकडे ती प्रतिभा आहे, केवळ त्याला सातत्याने डावलले जात आहे. गेल्या काही वर्षांतील सामने पाहिले तर फिंगर स्पीन करणारे गोलंदाज वरचढ ठरताना दिसत आहेत. चहलच्या जोडीने कुलदीप यादवही चांगला पर्याय आहे. भारतात विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे संघात चहल आणि कुलदीप यांना संधी मिळणे गरजेचे आहे, असेही गांगुली याने म्हटले आहे.
रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन तसेच अक्सर पटेल आहेतच, परंतू चहल, कुलदीपसह आणखी एक लेग स्पीन गोलंदाज आहे तो म्हणजे रवी बिष्णोई. त्याच्याकडेही अफाट गुणवत्ता आहे. याच गोलंदाजांना सामन्यांच्या महत्त्वानुसार रोटेशन पद्धतीने संधी दिली गेली तर ते भविष्यासाठीही लाभदायक ठरेल, असेही गांगुली म्हणाला.
आयपीएल स्पर्धेमुळे सध्या निवड समितीकडे खूप पर्याय उपलब्ध होत आहेत. मात्र, त्यांना संधी मिळते का व किती मिळते हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यांनाच एकाचवेळी संधी देणे शक्य नाही हे मलाही मान्य आहे मात्र, त्यासाठीच तर बीसीसीआयने रोटेशन पद्धती सुरू केली आहे. त्याचा लाभ घेत एकेकाला आजमावून पाहता येणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी ज्या स्पर्धा किंवा मालिका होणार आहेत, त्यात या गोलंदाजांना संधी देणे गरजेचे आहे. जो सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करेल तोच टीकेल, असेही गांगुली म्हणाला.
गुणवत्ता सिद्ध करूनही कानाडोळा
2019 सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत चहलने एकूण आठ सामने खेळले व त्यात 12 बळीही घेतले. मात्र, त्यानंतर त्याला सातत्याने मोठ्या स्पर्धांमध्ये संधीच दिली गेली नाही. गुणवत्ता सिद्ध केल्यानंतरही जर दुर्लक्ष होत असेल तर ते चिंताजनक आहे, असा शेराही गांगुलीने मारला.





