पुणे – पुणे-नगर ते छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वे मार्गाने जोडण्याच्या चर्चा मधल्या काळात सुरू होत्या. पण, या लोहमार्ग निर्मितीला पुन्हा ब्रेक लागला आहे. नगर शहराजवळ असलेल्या डोंगरामुळे हा मार्ग अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे मार्गाचे दुबार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नगर ते छत्रपती संभाजीनगर या नव्या लोहमार्गासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास छत्रपती संभाजीनगर येथून थेट पुण्याला वाहतूक सुरू होऊ शकते. अर्थात हा लोहमार्ग प्रकल्प सध्या फक्त चर्चा आणि सर्वेक्षणाच्याच टप्प्यात आहे. सध्या पुण्याहून नगरला जायचे झाल्यास दौंड काॅर्डलाइन हाच एक मार्ग आहे. पण, त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे प्रवासी रस्ते वाहतुकीला प्राधान्य देतात. याचा परिणाम म्हणून पुणे-नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग अत्यंत बिझी झाला आहे. त-्या मुळे या मार्गावर रेल्वेची मागणी सातत्याने केली जाते. नगर शहराजवळ मोठा डोंगर आहे. त्याचा विस्तार सुमारे पाच कि.मी. आहे, असे पहिल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. याबाबत रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देत पुन्हा सर्वेक्षणाची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान याबाबत चर्चा झाली असून, त्याला वैष्णव यांनी मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोठा औद्योगिक पट्टा जोडला जाणार छत्रपती संभाजीनगर येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. शिवाय, नगर आणि पुणे मार्गातही एमआयडीसी क्षेत्र आहे. हा थेट नवा लोहमार्ग झाल्यास उद्योगांसह सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय शनिशिंणापूर, नेवासा आदि धार्मिक स्थळेही रेल्वेच्या नकाशावर येणार आहेत. पण, हे काम लवकर होण्याची अपेक्षा प्रवाशांना आहे.