लोणी धामणी – शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाचा आनंद लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी घेतला. लहान मुलांना पोशाख, चाफ्याचे हार यांनी सजवून वीर देव बनवले जाते. त्यांची पारंपरिक ढोल, ताशा, हलगी वाजवत मिरवणूक काढली जाते.
संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून गावाच्या हनुमान मंदिरासमोर ज्येष्ठ मंडळींची लेझीमच्या तालावर आनंद साजरा केला जातो. ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालू असून, आजही सर्व ग्रामस्थ एकत्र येत हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतात असे मयूर सरडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुनीता चौधरी, बाळासाहेब विष्णू तांबे, गणेश तांबे, मनोज तांबे, बिपीन चौधरी, तान्हाजी महाराज तांबे, कल्पेश सरडे, केरभाऊ तांबे, कांताराम तांबे, सुरेश तांबे, हनुमंत तांबे, स्वप्नील तांबे, संदीप मिंडे, सचिन तांबे ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.
प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात सर्व मतभेद विसरून सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन सण साजरे करतात. गावातील धार्मिक एकोपा राहावा म्हणून सर्व तरुण मंडळी सप्ताह, गणेश उत्सव, नवरात्री उत्सव हे सण साजरे करत असतात. यातूनच गेली अनेक वर्षे ही परंपरा टिकून आहे.