Rohit Pawar : चाकण येथील ४ हजार कामगारांच्या रोजगारावर संकट; रोहित पवार उद्या उद्योजकांना भेटणार !
चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील सुमारे २० लघू उद्योजक त्रस्त झाले आहेत.

Rohit Pawar : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील सुमारे २० लघू उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास कंपन्या राज्याबाहेर किंवा खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे.
त्यामुळं चाकण सोडून न जाता सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी उद्या (शुक्रवार, दि. १४) सकाळी १० वाजता चाकण एमआयडीसी इथे आमदार रोहित पवार उद्योजकांची भेट घेणार आहे.
औद्योगिक वसाहतीतील विविध रस्ते आणि सुविधांची जबाबदारी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडे असल्याने समस्येचे निराकरण करताना अडथळे येत आहेत.
एमआयडीसी (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्ड्यांसोबतच अतिक्रमणे, अवजड वाहनांचे अनियंत्रित पार्किंग आणि वारंवार होणारा वीज-पाणीपुरवठा खंडित होण्याचा त्रासही उद्योजकांना सहन करावा लागत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो, ज्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येतात. तसेच, येथे स्वतंत्र वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि देखरेखीची व्यवस्था यांसारख्या आवश्यक सुविधांचीही कमतरता आहे.





