पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करा; महापालिकेचे पुणेकरांना आवाहन

पुणे : दिवाळी हा सण अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतिक मानला जातो. हा सण साजरा करताना नागरिकांना हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण यांसारख्या उदभवणाऱ्यासमस्यांना आळा घालण्याकरिता पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने पुणेकरांना करण्यात आले आहे.
या आनंदाच्या उत्सवात फटक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण पक्षी आणि आपल्यासाठी हानीकारक असल्याने सर्वांनी हा उत्सव प्रदूषण मुक्त साजरा करावा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
पुणेकरांनो हवा प्रदूषण रोखण्यासाठी ‘हे’ करा
फटाके हे वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात, तरी शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासठी प्रत्येक नागरिकांनी फटाक्यांचा वापर करणे टाळावे.
हवा प्रदूषणचे प्रमाण जास्त झाल्याने श्वसनाचे आजार होवू शकतात यासाठी जास्त धूर उत्सर्जित करणाऱ्या फटाक्यांचा वापर करणे टाळावे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी
मोठ्या आवाजाचे फटाके ध्वनी प्रदूषण करतात, अशा फटाक्यांचा वापर करू नये.
दिवाळीत १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके उडविण्यास मनाई केली आहे,
तरी यांसारखे फटाके उडविणे टाळावे.
नागरिकांनी शांतता क्षेत्र जसे की शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये इ. ठिकाणी फटाके उडवू नये.
‘हे’ आहेत पर्यावरणपूरक पर्याय
नागरिकांनी घर सजविण्यासाठी अधिक ऊर्जा कार्यक्षम प्रकाश देणारे एलईडी दिवे किंवा अपारंपारिक ऊर्जा स्रोत जसे की सौर दिवे वापरावेत.
रेडिमेड पीओपी पासून बनवलेले किल्ले पर्यावरणास घातक ठरतात त्यांचा वापर न करता दगड मातीपासून किल्ले बनवावेत.
रासायनिक रंग, रांगोळी न वापरता नैसर्गिक साहित्यांसह रांगोळी आकर्षक बनवावी.
प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपुरक किंवा रिसायकल करता येणाऱ्या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरुन पर्यावरणपूरक सजावट करावी.





