Nagar | दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही

अहिल्यानगर, – इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे तसेच वीज गेली तर जनरेटरची सोय असायला हवी. याशिवाय सीसीटीव्हीचे फुटेज निकाल संपेपर्यंत केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे. केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून त्याची पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाने यापूर्वीच सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला आहे. तरीदेखील मागच्या परीक्षेत अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले. आतापर्यंत केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज गेल्यास जनरेटर असल्याचे लेखी स्वरूपातच दिले जायचे व प्रत्यक्षात काहीच नसायचे ही वस्तुस्थिती होती. मात्र, आता शासनानेच त्या संदर्भातील आदेश काढला असून त्यानुसार प्रत्येक शाळेत विशेषत:बोर्ड परीक्षेच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर बंधनकारक करण्यात आले आहेत. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही, तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे. परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे.
दरम्यान, बोर्डाच्या परीक्षा केंद्रांच्या परिसरात व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही आहेत का, लाइट गेली तर जनरेटर किंवा अन्य पर्याय आहे का, मुबलक पाणी, अशा सर्व सोयी-सुविधा आहेत की नाहीत याची पडताळणी 15 डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. त्याचा अहवाल पुणे बोर्डाला सादर करण्याचे आदेश सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्यांना देण्यात आले आहेत. सुविधा नसलेल्या केंद्रांना काही दिवसांची मुदत दिली जाईल, तरीदेखील काहीच कार्यवाही न केल्यास केंद्राची मान्यता रद्द केली जाणार आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा दि. 24 जानेवारीपासून सुरू होईल. दि. 10 फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक कार्य संपणार आहे. दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून त्यात प्रत्येक पेपरमध्ये एक-दोन दिवसाचे अंतर असेल. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षा दि.3 ते 20 फेब्रुवारी या काळात पार पडणार आहे. दि.21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.





