Causes of Memory Loss : आजकाल अनेक लोकांना ३० व्या वर्षानंतरच विसरायला होतंय, लक्ष लागत नाही, सतत थकवा जाणवतोय. मात्र ही गोष्ट सामान्य समजून दुर्लक्ष करू नये. चुकीची जीवनशैली, अपुरी झोप आणि वाढलेला ताण याचा थेट परिणाम मेंदूवर होतो, असं तज्ज्ञ सांगतात. आयुर्वेदात याला ‘प्रज्ञापराध’ म्हणतात, म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धीच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे. तर विज्ञानानुसार ३० नंतर मेंदूच्या पेशींवर ताण, झोपेचा अभाव आणि चुकीच्या सवयींचा परिणाम दिसू लागतो. अपुरी झोप आयुर्वेदात झोपेला भूतधात्री म्हणजेच जीवन पोसणारी मानलं आहे. गाढ झोपेत मेंदूतील घाणेरडे घटक (टॉक्सिन्स) बाहेर पडतात. रोज पुरेशी झोप न झाल्यास स्मरणशक्ती कमी होते आणि चिडचिड वाढते. रोज ठराविक वेळेला झोपणं आणि उठणं ही सवय मेंदू शांत ठेवते. शारीरिक हालचालींचा अभाव रोज चालणं, हलका व्यायाम किंवा योग केल्याने मेंदूत रक्तप्रवाह वाढतो. यामुळे मेंदूच्या पेशी मजबूत होतात. ३० नंतर जड व्यायाम गरजेचा नाही, पण रोज थोडी हालचाल नक्कीच हवी. चुकीचा आहार आयुर्वेदात म्हटलं आहे जसं अन्न, तसं मन. जास्त गोड, तळलेले आणि पॅकेज्ड अन्न मेंदूत सूज निर्माण करतं. यामुळे लक्ष आणि आठवण कमजोर होते. घरी बनवलेलं सकस अन्न, प्रथिने, चांगली चरबी (तूप, कडधान्ये), भाज्या आणि भरपूर पाणी मेंदूसाठी आवश्यक आहे. मेंदूला आव्हान न देणे सतत मोबाईल पाहणं मेंदूला आळशी बनवतं. रोज वाचन, लेखन, नवीन भाषा शिकणं किंवा एखादा नवा छंद जोपासल्यास मेंदू सक्रिय राहतो. यामुळे स्मरणशक्ती टिकून राहते. वाढलेला ताण सततचा ताण मेंदू कायम तणावात ठेवतो. यामुळे झोप आणि आठवण दोन्ही बिघडतात. रोज काही वेळ खोल श्वास घेणं, निसर्गात वेळ घालवणं आणि भावना दडपून न ठेवता व्यक्त करणं मेंदूला आराम देतं. थोडक्यात, ३० नंतर विसरभोळेपणा वाढणं टाळायचं असेल, तर झोप, आहार, व्यायाम आणि मानसिक शांतता या सवयी आजपासूनच सुधारायला हव्यात. मेंदूची काळजी घेतली, तर तोही आयुष्यभर साथ देईल.