प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – खताळपट्टा, ढेकळवाडी (ता. बारामती) येथील तरुण शेतकरी पार्थ अजित झारगड (वय 25) यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल 3 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारगड कुटुंब नेहमीप्रमाणे 21 तारखेच्या रात्री 10.30 वाजता जेवण करून झोपले होते. रात्री 3.30 वाजता पार्थ झारगड यांच्या पत्नी पूजा झारगड यांच्या किंकाळ्यांनी सगळ्यांची झोप मोडली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती बेडरूममधून पळून जाताना दिसला. पार्थ यांनी त्याचा पाठलाग केला असता तो घराच्या मागील दरवाजातून उसाच्या शेतात पळून गेला. नंतर पत्नी पूजाने सांगितले की चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन हिसका मारून नेले. कुटुंबीयांनी घराची पाहणी केली असता मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. जिन्याजवळ पर्स, पाकीट व बचतगटाची पुस्तके पडलेली दिसली. बेडरूममधील कपाट उघडे व अस्ताव्यस्त होती. कपाटातील दागिने व रोख रक्कम पूर्णपणे गायब असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सोन्याचे मिनी गंठन 10 ग्रॅम (55 हजार), सोन्याची चैन 20 ग्रॅम (1 लाख 10 हजार), सोन्याचे बदाम 1 ग्रॅम (6 हजार), चांदीचे वाळे, पैंजन, ब्रेसलेट, कडे, चैन 7 ग्रॅम (10 हजार), रोख रक्कम 1 लाख 50 हजार (500च्या 300 नोटा) असे 3 लाख 31 हजारांचा ऐवज नेला. घटनेची नोंद बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून चोरट्याचा शोध सुरु आहे. गावात अचानक घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.