Pune : सह्याद्रीत रंगणार 120 किमीची साहसी शर्यत; सायकलिंगपासून कयाकिंगपर्यंत सात आव्हानांचा थरार
Pune : भाटघर धरण परिसरात २८-२९ नोव्हेंबरला कॅश्युरिना ॲडव्हेंचर एक्स २.०. १२० किमी सह्याद्री एक्स्पेडिशनसह सहा प्रकारच्या स्पर्धा.

Pune : शारीरिक तंदुरुस्ती, साहस आणि सहनशक्तीची परीक्षा घेणारी ‘कॅश्युरिना ॲडव्हेंचर एक्स २.०’ ही बहुविध साहसी क्रीडा स्पर्धा २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी भोर येथील भाटघर धरण परिसरात होणार आहे. लाइफफिट स्पोर्ट्स आणि कॅश्युरिनातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅश्युरिना रिसॉर्ट पार्क, कुरुंजी येथे स्पर्धेचा प्रारंभ आणि समारोप होईल.
प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, गिर्यारोहक उमेश झिरपे, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, गंगोत्री होम्सचे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे आणि लाइफफिट स्पोर्ट्झचे संस्थापक संचालक महेंद्र लोकरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची माहिती देण्यात आली.
‘ही केवळ शर्यत नाही… एक साहसी मोहीम आहे!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आहे. यात सहनशक्ती, संघभावना, दिशादर्शन आणि निसर्गभ्रमंतीचा अनुभव मिळणार आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, खडकाळ वाटा, किल्ल्यांचा परिसर आणि भाटघर धरणाचा परिसर स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असेल.
१२० किमीची सह्याद्री एक्स्पेडिशन –
स्पर्धेतील सर्वात मोठे आव्हान १२० किमीची ‘सह्याद्री एक्स्पेडिशन’ आहे. यात सायकलिंग, धावणे, ट्रेकिंग, कयाकिंग, नदी ओलांडणे, रोप अॅक्टिव्हिटी आणि नकाशा व होकायंत्राच्या मदतीने दिशादर्शन अशा प्रकारांचा समावेश आहे. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी २४ तासांची वेळमर्यादा आहे.
या मार्गावर सर्वत्र दिशादर्शक खुणा नसतील. त्यामुळे सहभागी संघांना नकाशा आणि होकायंत्राच्या मदतीने चेकपॉइंट शोधावे लागतील. शारीरिक ताकदीसोबतच नियोजन, निर्णयक्षमता आणि संघातील समन्वयाचीही परीक्षा होणार आहे. सहभागी संघांना आवश्यक साहित्य, अन्न आणि पाणी स्वतःसोबत ठेवावे लागेल.
या स्पर्धेतील पात्र चार सदस्यांच्या प्रीमियर संघाला २०२७ च्या भारतीय अॅडव्हेंचर रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची पात्रता मिळविण्याची संधी असेल. भारतीय चॅम्पियनशिपमधील विजेत्या संघाला नियमांनुसार २०२७ च्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याची संधी मिळू शकते.
दोन दिवसांत सहा प्रकार
२८ नोव्हेंबर :
१२० किमी सह्याद्री एक्स्पेडिशन : सायकलिंग, धावणे, ट्रेकिंग, कयाकिंग, नदी ओलांडणे, दिशादर्शन आणि रोप अॅक्टिव्हिटी.
७५ किमी सह्याद्री एन्ड्युरन्स चॅलेंज : ५० किमी सायकलिंग, ८ किमी रस्त्यावरील धावणे, १७ किमी ट्रेल वॉक/ट्रेकिंग आणि नदी ओलांडणे.
५० किमी भाटघर बॅकवॉटर सायकलिंग चॅलेंज : भाटघर धरण परिसरातील मार्गावर सायकलिंग. यात सुमारे १,००० ते १,२०० मीटर उंचीतील चढ-उतार असतील.
२९ नोव्हेंबर :
५५ किमी ऑलिम्पिक ड्युएथलॉन : १० किमी धावणे, ४० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे. वैयक्तिक आणि दोन सदस्यांच्या रिले प्रकारात स्पर्धा होईल.
२५ किमी राजगड फोर्ट चॅलेंज : ८ किमी रस्त्यावरील धावणे आणि १७ किमी ट्रेल वॉक/ट्रेकिंग.
१० किमी कॅश्युरिना ट्रेल रन : जंगलातील पायवाटा आणि भाटघर धरणालगतच्या ग्रामीण रस्त्यांवर धावण्याची संधी.
स्पर्धेतील प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र नियम, वेळमर्यादा आणि आवश्यक साहित्य लागू असेल. १२० किमीच्या मोहिमेत संघातील सर्व सदस्यांनी संपूर्ण शर्यतीदरम्यान एकत्र राहणे आवश्यक आहे.
चार लाखांची पारितोषिके –
विविध प्रकारातील विजेत्यांना एकूण सुमारे चार लाख रुपयांची पारितोषिके आणि पदके देण्यात येणार आहेत. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना फिनिशर मेडल आणि स्पर्धेनंतर अल्पोपहार दिला जाईल. नियमांनुसार वैद्यकीय मदत आणि जलक्रीडांसाठी सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जातील.
स्पर्धेचा तपशील :
नाव : कॅश्युरिना ॲडव्हेंचर एक्स २.०
दिनांक : २८ व २९ नोव्हेंबर २०२६
स्थळ : कॅश्युरिना रिसॉर्ट पार्क, कुरुंजी, भाटघर धरण परिसर, भोर, पुणे
आयोजक : लाइफफिट स्पोर्ट्झ, कॅश्युरिना
संपर्क : ८०८७६०८३२६ / ९६२३५१९१९३
ऑनलाइन नोंदणी : https://alpharacingsolution.com/e/Casuarina-Adventure-2026






