Pune News: डॉक्टरकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी; २ कथित पत्रकारांवर गुन्हा
Pune News: क्लिनिकचे नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून दवाखाना बंद पडण्याची धमकी

पुणे : अल्पवयीन मुलींचे गर्भपात करत असल्याची माहिती असल्याचे सांगून डॉक्टरांविरोधात बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन कथित पत्रकारांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विमाननगर परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव ऊर्फ प्रसाद बोरसे (२५) आणि शुभम सौदागर (२६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ ऑगस्ट रोजी रात्री ११:३० ते मध्यरात्री १२:०० सुमारास टिंगरेनगर येथील एका हॉटेलमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपण पत्रकार असल्याचे सांगून डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला तुमच्याकडून अल्पवयीन मुलींचे गर्भपात केले जात असल्याची माहिती आमच्याकडे आहे, असे सांगितले. तसेच क्लिनिकचे नाव वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून दवाखाना बंद पाडू शकतो, अशी धमकी दिली.
तुम्हाला पाच वर्षांची शिक्षा होईल, जामीन मिळण्यासाठी तीन-चार वर्षे लागतील आणि तुमचे सर्व काही उद्ध्वस्त करू, अशी भीती आरोपींनी घातली. या प्रकरणातून वाचायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील; अन्यथा सकाळी अटक होईल, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माने करीत आहेत.
Digestive Tea: पचन सुधारण्यासाठी सोहा अली खानचा घरगुती उपाय; 5 मिनिटांत तयार होईल ‘हा’ चहा





