राजगुरूनगर, – खेड तहसीलदार कार्यालयातील लिपिकाला अधिकार नसताना सही व शिक्का देऊन रेशनिंग कार्ड तयार करणारा आणि हे बोगस प्रकरण उघडकीस आणून पुन्हा ते मिटवण्यासाठी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्या दोघांवर खेड पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. महेश लक्ष्मण नेहरे (रा. वाडा, ता. खेड), सुनिल किसन नंदकर (रा. ता.आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील नंदकर हे महसूल कर्मचारी असून ते आंबेगाव तालुक्यात नेमणुकीस आहेत. खेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात हस्तक्षेप करून त्यांनी महेश नेहरे यांच्या पत्नीच्या नावे बोगस कार्ड दिले होते. ते देताना ऑनलाइन चार हजार रुपये घेतल्याचे अधिकार्यांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यावरुन चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळाल्यावर महेश नेहरे याने अधिकार्यांची अडचण झाल्याचा समाज करून हे प्रकरण मिटवण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपये द्या असा थेट मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज केला. याबाबत तहसीलदार देवरे यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून कारवाईचे आदेश आल्यानंतर तहसील कार्यालयातील लिपिक अक्षय मोहन कोरपे यांनी याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुनाजी जाधव, पोलीस अंमलदार रामदास बोराडे करीत आहेत. अद्याप मात्र कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अनेक बडे मासे गळाला खेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनिंग कार्ड आणि स्वस्त धान्य वाटपात अनेक संशयास्पद प्रकार घडत असल्याच्या चर्चा तालुक्यात आहेत. बोगस रेशनिंग कार्ड वाटप आणि त्यांच्याशी तालुक्यातील दुकानदारांचे असलेले साटेलोटे याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही वर्षातले प्रकार त्यातुन उघड होऊ शकतात. तालुक्यातील अनेक बडे मासे त्याद्वारे गळाला लागतील. काही माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती यांच्या कुटुंबातील व्यक्ती रेशन वरील धान्याचा साठा इतरत्र विक्री करीत असताना त्या त्या वेळच्या तहसीलदार, अधिकार्यांच्या तपासात पुढे आले होते. मात्र तालुक्यातील बड्या नेत्यांच्या कृपाशीर्वादाने हे सर्वजण सहीसलामत सुटले. योग्य चौकशी झाल्यास खळबळ उडवून देणार्या घटना जनतेसमोर येऊ शकतात.