Clutch Chess -The Legends Tournament : आनंद -कॅस्पारोव्ह तब्बल 30 वर्षांच्या कालावधीनंतर येणार आमनेसामने

सेंट लुई (अमेरिका) : भारताचा माजी विश्वविजेता ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद व रशियाचा महान ग्रॅंडमास्टर गॅरी कास्पारोव्ह हे तब्बल 30 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. बुधवारपासून सुरु होणाऱ्या क्लच बुद्धिबळ – द लेजेंड्स टूर्नामेंट या स्पर्धेत दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर असतील. दोन्ही खेळाडू 1995 मध्ये आमनेसामने आले होते.
न्यूयॉर्क येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 107 व्या मजल्यावर करण्यात आले होते. त्यावेळी दोघांमध्ये शेवटचा सामना झाला होता. या सामन्यामध्ये रशियाच्या गॅरी कास्पारोव्हने विश्वनाथन आनंदचे आव्हान 10.5-7.5 असे परतवून लावले होते. त्यानंतर 2004 मध्ये गॅरी कास्पारोव्ह निवृत्त झाला होता. तो आता केवळ ब्लिट्झ किंवा प्रदर्शनी सामन्यांमध्ये सहभागी होतो. भारतीय ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद देखील कधी कधी टॉप टूर्नामेंटमध्ये खेळताना दिसून येतो.
क्लच बुद्धिबळ ही स्पर्धा तीन दिवस रंगणार असून या स्पर्धेत दररोज चार गेम खेळले जाणार आहेत. यामध्ये २ रॅपिड तर २ ब्लिट्झ गेम असतील. पहिल्या दिवशी प्रत्येक विजयासाठी प्रत्येकी १ गुण असणार आहे. दुसऱ्या दिवशी प्रत्येक विजयासाठी २ तर तिसऱ्या दिवशी प्रत्येक विजयासाठी ३ गुण मिळणार आहेत. अशा प्रकारच्या गुणवाटपामुळे ही स्पर्धा शेवटच्या दिवसापर्यंत मनोरंजक होण्याची अपेक्षा आहे. अशा सामन्यांना ‘फ्रीस्टाईल बुद्धीबळ’ म्हणून ओळखले जाते. अशा स्पर्धांमध्ये खेळाडूंना पारंपारिक सीमांच्या बाहेर जावून खेळण्याची परवानगी असते. त्यामुळे भारताच्या विश्वनाथन आनंद व रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांच्यामध्ये रंगणारा हा सामना बुद्धीबळ प्रेमींसाठी मेजवाणी ठरणार आहे.
या स्पर्धेत एकूण १२ लढती होतील. या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम देखील 144000 डॉलर्स (अंदाजे 1.20 कोटी रुपये) ठेवण्यात आली आहे. विजेत्या खेळाडूला 70 हजार डॉलर्स (अंदाजे 62 लाख) तर पराभूत खेळाडूला 50 हजार डॉलर्सचे (अंदाजे 44 लाख) बक्षीस मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंमधील सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 60 हजार डॉलर्सचे (अंदाजे 53 लाख) बक्षीस मिळू शकेल. आयोजकांनी २४ हजार डॉलर्सचा (अंदाजे 21 लाख) बोनस देखील जाहीर केला आहे.





