Rohit Sharma Captaincy : अवघ्या 6 महिन्यात हिरोचा झाला झिरो..! कर्णधार रोहितच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, थेट रिटायरमेंट पर्यत पोहचली चर्चा…

Team India & Rohit Sharma Captaincy : अवघ्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे 29 जून 2024 रोजी कर्णधार रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला ते जेतेपद मिळवून दिले होते ज्याची सगळे 17 वर्षांपासून वाट पाहत होते. भारतीय संघ 29 जून रोजी टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. रोहितने वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताचा ध्वज फडकावला होता आणि तो बार्बाडोसच्या मैदानावर विजयाची माती चाखताना दिसला होता.
संपूर्ण देशात दिवाळी आणि होळी एकाच दिवशी साजरी झाल्यासारखे वाटत होते. मुंबईच्या रस्त्यावर एकच नाव गुंजत होतं ‘मुंबई चा राजा रोहित’. रोहित, ज्याचे प्रत्येक भारतीय चाहते कौतुक करत होते, तोच भारतीय कर्णधार आजकाल चाहत्यांच्या डोळ्यात खुपत आहे. अवघ्या सहा महिन्यांतच रोहित हिरोवरून झिरो झाला आहे. ज्या चॅम्पियन कर्णधाराची स्तुती करताना जग कधीच कंटाळले नाही, त्याला आता अनेकाकडून निवृत्तीच्या सूचना दिल्या जात आहेत.
हिरोवरून झिरो झाला कर्णधार रोहित शर्मा…
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा रोहित शर्मा टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. न्यूझीलंडकडून मायदेशात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलियात रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची अवस्था अत्यंत वाईट आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न आता फक्त स्वप्नच राहिले आहे.
सिडनीतील कसोटी जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत राखण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला, तर कांगारूंच्या भूमीवर संघाची प्रतिष्ठा कायम राहिल. हिटमॅन रोहित शर्मा फलंदाजीत तर फ्लॉप ठरलाच आहे पण आता त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भारतीय कर्णधारासोबत मैदानावरही काहीही चांगल घडत नाहीए. टी-20 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर रोहितचे अच्छे दिन एकदमच गायब झाल्यासारखं वाटत आहे. रोहितचे फलंदाजीतील सातत्याचे अपयश आता कर्णधारपदामध्येही स्पष्टपणे दिसत आहे, त्याचे परिणाम टीम इंडियाला भोगावे लागत आहेत.
लाजिरवाण्या विक्रमाची यादीत रोहितचा समावेश….
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी सामने (2024, 6 कसोटी पराभव ) गमावणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यात विराट कोहलीचे नाव प्रथम क्रमांकावर येते. किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 2018 मध्ये एकूण सात कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने गमावणारे भारतीय कर्णधार
7 – विराट कोहली – 2018
6 – रोहित शर्मा – 2024
5 – एमएस धोनी – 2011
5 – एमएस धोनी – 2014
5 – सौरव गांगुली – 2001
5 – सौरव गांगुली – 2002
5 – कपिल देव – 1983
मालिकेत आतापर्यंत केवळ 31 धावा….
या मालिकेत आतापर्यंत रोहित शर्मा 6.20 च्या सरासरीने केवळ 31 धावा करू शकला आहे. मात्र, मेलबर्न कसोटीत भारतीय संघाच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या फलंदाजीवरच नव्हे तर त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मेलबर्न कसोटीनंतर रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीबाबत मोठी घोषणा करू शकेल, असे मानले जात होते, परंतु त्याने निवृत्तीबाबतच्या अटकळांना पूर्णपणे नकार दिला आहे.
मागील 15 डावांमध्ये…
रोहितच्या खराब फॉर्मचा अंदाज यावरून लावता येतो की, गेल्या 15 डावांमध्ये त्याने केवळ एकच अर्धशतक झळकावले आहे. या कालावधीत त्याच्या धावा अनुक्रमे 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3 आणि 9 अशा राहिल्या आहेत. त्याची यंदाची कामगिरी लाजिरवाणी आहे. त्याने 14 कसोटी सामन्यांच्या 26 डावात फक्त 619 धावा केल्या आहेत.





