Canada Football History : कँनडाने फुटबॉलच्या इतिहासात लिहिला नवा अध्याय! दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदाच ‘राउंड ऑफ १६’ मध्ये धडक
Canada Football History : या ऐतिहासिक विजयासह कॅनडाच्या संघाने पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या 'राउंड ऑफ १६' मध्ये प्रवेश मिळवला आहे.

Canada vs South Africa FIFA World Cup 2026 Round of 32 Result : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या बाद फेरीतील पहिल्याच सामन्यात सह-यजमान कॅनडाने फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा चमत्कार करून दाखवला आहे. लॉस एंजिल्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ‘राउंड ऑफ ३२’ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात कॅनडाने दक्षिण आफ्रिकेचा १-० असा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या ऐतिहासिक विजयासह कॅनडाच्या संघाने पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या ‘राउंड ऑफ १६’ मध्ये प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांच्या फुटबॉल इतिहासातील हा पहिलाच नॉकआऊट सामना होता.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही गोलरक्षकांचा भिंतीसारखा बचाव –
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांवर बाद फेरीचे मोठे दडपण स्पष्टपणे जाणवत होते. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी बचावात्मक खेळ पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेने सामन्यातील पहिला हल्ला चढवला, परंतु कॅनडाचा गोलरक्षक मॅक्सिम क्रेप्यू याने तो अत्यंत शिताफीने हाणून पाडला. यानंतर डावाच्या ४३ व्या मिनिटाला कॅनडाला आघाडी घेण्याची सुवर्णसंधी मिळाली होती; मात्र आफ्रिकेचा स्टार गोलरक्षक रोनवेन विल्यम्सने एका जादुई बचावाच्या जोरावर पहिल्या हाफमध्ये स्कोर ०-० असा बरोबरीत राखला.
अल्फांसो डेव्हिसची एन्ट्री अन् इंजरी टाईममध्ये इस्टाकियोचा ऐतिहासिक गोल –
With this incredible goal, in extra time, Canada 🇨🇦 is heading to the final 16 for the first time in World Cup history ⚽️
Huge congrats to the entire team @CANMNT_Official— you have made all of Canada proud! pic.twitter.com/YPNTRv3eZA
— Danielle Smith (@ABDanielleSmith) June 28, 2026
दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला दुखापतीतून सावरलेला कॅनडाचा स्टार खेळाडू अल्फांसो डेव्हिस मैदानावर उतरला आणि सामन्याचे चित्रच पालटले. डेव्हिसच्या वेगवान हालचालींमुळे दक्षिण आफ्रिकेच्या बचावफळीवर प्रचंड दडपण आले.
सामना अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच, ९२ व्या मिनिटाला (इंजरी टाईम) कॅनडाचा मिडफील्डर स्टीफन इस्टाकियो याने इतिहास रचला. त्याने कोणतीही चूक न करता एक अचूक आणि वेगवान शॉट थेट नेटमध्ये मारून गोल केला. या गोलसह संपूर्ण स्टेडियममध्ये कँनडाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कॅनडाचा पुढील सामना आता ४ जुलै रोजी ह्युस्टन येथे नेदरलँड्स किंवा मोरोक्को यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे.





