Dalai Lama : आणखी ३०-४० वर्षे सहज जगू शकतो ! दलाई लामांकडून उत्तराधिकारी नेमण्याला पूर्णविराम

Dalai Lama – मला अवलोकितेश्वराचे आशीर्वाद असून त्यांच्यासोबत राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मी पुढील ३०-४० वर्षे लोकांची सेवा करण्यासाठी जगण्याची आशा ठेवून आहे, अशा शब्दांत तिबेटी आध्यात्मिक नेते १४ वे दलाई लामा यांनी शनिवारी त्यांच्या उत्तराधिकारीच्या घोषणेबाबतच्या अफवांना पूर्णविराम दिला. शनिवारी मॅकलिओडगंजमधील त्सुगलागखांग येथील मुख्य दलाई लामा मंदिरात त्यांच्या ९० व्या वाढदिवसापूर्वी आयोजित दीर्घायुष्य प्रार्थना समारंभात बोलताना दलाई लामा तेन्झिन ग्योत्सो यांनी हे वक्तव्य केले.
तिबेटी आध्यात्मिक नेते म्हणाले, बऱ्याच भविष्यवाण्या पाहून मला असे वाटते की, मी आतापर्यंत माझे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. आता तुमच्या प्रार्थना फलदायी ठरल्या आहेत. जरी आपण आपला देश गमावला असला आणि आपण भारतात निर्वासित जीवन जगत असलो, तरिही येथे मी लोकांना खूप फायदा करू देऊ शकलो आहे. जे येथे धर्मशाळेत राहत आहेत त्यांची सेवा करण्याचा माझा मानस आहे.
केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी १४ व्या दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली, तर त्यांचा ९० वा वाढदिवसाचा समारंभ रविवारी होणार आहे. जगभरातून हजारो भाविक येथे आले आहेत आणि मलाही त्यात सहभागी होता आले.
लामा आणि त्यांची जादू…
तिबेटी आध्यात्मिक नेते १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्योत्सो यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आजपासून मॅकलिओडगंजमध्ये दोन दिवसांचा कार्यक्रम सुरू आहे. या समारंभासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि इतर लोक मुख्य तिबेटी मंदिर आणि दलाई लामा यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत.
मॅकलिओडगंज येथील दलाई लामा मंदिर भव्य पद्धतीने सजवण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या प्रार्थना सभेत दलाई लामा स्वतः उपस्थित होते. रविवारी केक कापला जाईल आणि दलाई लामा अनुयायांना आशीर्वाद देतील.
१४ वे दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ६ जुलै रोजी अधिकृतपणे साजरा केला जात आहे. सुमारे ४८ देशांतील बौद्ध धर्माचे हजारो अनुयायी आणि दलाई लामा धर्मशाळेत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाबाबत सुरक्षा यंत्रणाही पूर्णपणे सक्रिय आहेत.





