Sanjay Raut : ‘सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्याने…’; संजय राऊतांची PM मोदींवर बोचरी टीका
Sanjay Raut : सरकारने शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची मदत पुरेशी आहे का, याचाही विचार केला पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut : दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरी केवळ एक दिवस दिवाळी साजरी केल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची मदत पुरेशी आहे का, याचाही विचार केला पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री आणि राज्यकर्त्यांचे हे कर्तव्यच आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बसून फराळ करत आहेत. मात्र, हा फराळ खरोखरच शेतकऱ्याच्या घरचा आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्था केली आहे, असा खोचक सवालही त्यांनी केला.
मोदींच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यावरही टीका
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवाळीच्या निमित्ताने छत्तीसगडमधील बस्तर येथे जाऊन सुरक्षा दलातील जवानांसोबत सण साजरा करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी इन्स्टाग्रामवरून दिली. ‘आपल्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी बस्तरला जात आहे. एकेकाळी नक्षलवादाने ग्रासलेल्या या भागात आता विकासाला चालना मिळत आहे,’ असे मोदी यांनी म्हटले आहे.
मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. मात्र, केवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्याने चीनची घुसखोरी थांबत नाही. तसेच पुलवामा आणि पहलगामसारख्या घटना घडण्यापासूनही रोखता येत नाहीत, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर टीका केली.
Weather Update: दिवाळीत थंडीची चाहूल! राज्यातील अनेक भागात हवेत गारवा…





