प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीच्या कथित गैरव्यवहारानंतर जिल्ह्यात जमीन खरेदी-विक्रीचे वातावरण तापले असून, शिरूर तालुक्यातील महार वतन जमीन गैरव्यवहार पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. एमआयडीसीचा परिस स्पर्श झाल्याने जमिनींच्या किमती वधारल्या असून, याच पार्श्वभूमीवर अनेक बेकायदेशीर व्यवहार झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिक्रापूर, रांजणगाव, कोंढापुरी, शिंगाडवाडी, टाकळी हाजी या गावांमध्ये महार वतनाच्या जमिनींच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या आरोपांनुसार काही सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने हे व्यवहार पार पडले असून, कागदपत्रांमध्ये फेरफार, बोगस वारस दाखवणे, नियमबाह्य हक्कपत्रे तयार करणे, असे प्रकार घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कायद्यानुसार वतनाच्या जमिनींची मुक्तपणे खरेदी-विक्री करता येत नसतानाही, वाढत्या बाजारभावाचा मोह आणि औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराचा फायदा घेण्यासाठी काही दलालांनी नियमबाह्य पद्धतीने व्यवहार केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या बोगस व्यवहारांमुळे मूळ जमीनधारक, वारसदार आणि सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ग्रामीण भागातील जमीन व्यवस्थापनातील गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रभावी देखरेख यंत्रणा उभी करण्याचीही मागणी केली जात आहे.