लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींच्या बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेने टळली जीवीतहानी

पुणे – लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसने अचानक पेट घेतला. मात्र चालकाच्या सतर्कतेने सर्व वऱ्हाडी सुखरुप आहेत. ही घटना मुळशी तालुक्यातील भुगाव येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लग्नाचे वऱ्हाड घेऊन मिनीबस पिरंगुट येथून हडपसरला निघाली होती. बसमध्ये एकूण बारा प्रवासी होते. गाडी भुगाव येथे आल्यानंतर अचानक गाडीच्या रेडिएटर जवळून धूर निघत होता. चालकाच्या लक्षात येताच त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवून बसमधील वऱ्हाडी मंडळींना बाहेर निघण्यास सांगितले. सर्व प्रवासी उतरताच गाडीने पेट घेतला. या घटनेत मिनीबस पूर्ण जळून खाक झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व वऱ्हाडी सुखरूप आहेत. कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दोन आणि फाॅरेस्ट ट्रेल्स येथील एक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तिन्ही गाड्यांनी आग आटोक्यात आणली. चालकाच्या सतर्कतेने जीवीत हानी टळल्याने चालकाचे कौतुक होत आहे.





