Burn Hospital: बर्न रुग्णालयाचे काम दोन वर्षांपासून संथ गतीने; प्रशासकीय अनास्थेने शहरातील रुग्णांची गैरसोय
आगीच्या घटनांमध्येही वाढ

पिंपरी – महापालिकेच्या वतीने तालेरा रुग्णालयासमोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारतीत उभारण्यात येत असलेल्या बर्न रुग्णालयाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे.
इमारतीचे बाह्य बांधकाम हे यापूर्वीच पूर्ण झाले आहे; मात्र अंतर्गत भागातील महत्त्वाच्या सुविधा आणि यंत्रसामुग्रीअभावी हे रुग्णालय अजूनही नागरिकांच्या सेवेत दाखल झालेले नाही. त्यामुळे भाजलेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी पुण्यातील रूग्णालयात नेण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे.
शहराची लोकसंख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत. केमिकल, फटाके, गॅस सिलिंडरच्या दुर्घटनांमध्ये भाजण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, शहरात अद्ययावत बर्न हॉस्पिटल नसल्याने गंभीर रुग्णांना ससून रुग्णालयात किंवा पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवावे लागते. उपचार मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.
महापालिकेने २०२२ मध्ये शहरासाठी स्वतंत्र बर्न हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता. तालेरा रुग्णालयाच्या समोरील महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत हे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या ठिकाणी ३० बेडमध्ये ६ बेडचा आयसीयू, १२ खाटांचा महिला विभाग, १२ खाटांचा पुरुष विभाग सुरु केला जाणार आहे.
त्याशिवाय अत्याधुनिक हायड्रेशन युनिट, प्लास्टिक सर्जरी सुविधा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन विभाग इत्यादी विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या २०२४ – २५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बर्न वॉर्डसाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
महापालिकेच्या एकाही रुग्णालयात सध्या बर्न वॉर्ड उपलब्ध नाही. तळवडे येथे २०२३ मध्ये स्पार्कल फायर कॅन्डल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १४ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी बर्न वॉर्ड सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा करुन दोन वर्षे झाली तरी अद्याप बर्न वॉर्ड सुरु झाला नाही. प्रत्यक्षात मात्र या कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. सध्या या इमारतीत स्थापत्य विभागाचे बहुतांश काम बाकी आहे.
स्थापत्यचे काम अद्याप अपूर्ण
तालेरा रुग्णालयासमोरील इमारतीत बर्न रुग्णालयाचे स्थापत्य विभागाचे काम अद्याप बाकी असल्याचे दिसत आहे. इमारतीत बर्न आयसीयू, ऑपरेशन थिएटर उभारण्याचे नियोजन होते. मात्र, स्थापत्य विभागाच्या दिरंगाईमुळे काम रखडले आहे. इमारतीचे प्लास्टर, फ्लोरिंग, टॉयलेट ब्लॉक अपूर्ण आहे. तर आतील काम तर सुरूच झालेले नाही. मनुष्यबळ कमी लावल्याने अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. स्थापत्य विभागाचे काम पूर्ण झाल्याशिवाय विद्युत विभागाला काम करता येत नाही.
विद्युत विभागाचे काम ठप्प
तालेरा रुग्णालयासमोरील प्रस्तावित बर्न रुग्णालयाच्या विद्युत विभागाचे संपूर्ण काम स्थापत्य विभागामुळे ठप्प झाले आहे. आमचे साहित्य खरेदी करून तयार आहे, परंतु स्थापत्यचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
‘विद्युत विभागाकडून आवश्यक साहित्य खरेदी झाली आहे. परंतु स्थापत्य विभागाचे काम बाकी असल्याने आम्हांला इतर कामे करता येत नाहीत. स्थापत्यचे काम पूर्ण झाले की, आम्ही दिलेल्या मुदतीत विद्युतचे काम पूर्ण करणार आहे.’ – अनिल भालसाखळे, सह शहर अभियंता, विद्युत विभाग.





