मथुरा : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील मांट विधानसभेचे आमदार तथा भाजपा नेते राजेश चौधरी यांच्या भावाने व पुतण्याने एका रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा, रुग्णालयात तोडफोड केल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील मोहाली रोडवर असलेल्या डी. एस. रुग्णालयातील आहे. या व्हिडीओत दिसत आहे की भाजपा आमदार राजेश चौधरी यांचे नातेवाईक रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत. ही हाणामारी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भाजपा आमदार चौधरी यांच्या आईला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी आमदाराच्या आईवर उपचार केले आणि रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र रविवारी सकाळी आमदार चौधरी यांचे भाऊ संजय चौधरी, जितेंद्र चौधरी, पुतण्या देव चौधरी आणि त्यांचे कार्यकर्ते या रुग्णालयात दाखल झाले. या लोकांनी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सना मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मारहाण करणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या डॉक्टरांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.