खटाव, {किरण देशमुख} – बैलगाडी शर्यत म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. बैलगाडी शर्यत पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. ती शेतकरी वर्गाने आजवर जिवापाड जपली आहे. काळ बदलला तशी बैलगाडी शर्यत पण बदलली. पूर्वी हा मातीतला खेळ होता. आता व्यापारी धनदांडग्यांच्या तो ‘खेळ’ झाला आहे. बैलगाडी शर्यतीमधील निकोप स्पर्धा मागे पडून इर्षा, खुन्नस, बदला, वायदी, भरमसाठ पैसा यात गुरफटून गेली आहे. या जीवघेण्या शर्यतीत माणसाचा ‘जीव’ कवडीमोल झाला आहे. या फे-यात अडकल्यानेच ‘रण’ जिंकून ‘जित’ मिळविण्यासाठी धडपडणा-याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यती मागची मैदानाबाहेरची ‘काळी’ दुनिया ‘उजेडात’ आली आहे. यात इवल्याशा ‘अंकुरण’ अन् ‘अंकिता’ यांचा ‘आधार’ मात्र हरपला आहे. बैलगाडी शर्यत जपली पाहिजे. परंपरा टिकली पाहिजे. पण व्यवहार जपत शर्यत म्हणून खेळली पाहिजे. पूर्वी बैलगाडी शर्यत म्हणजे ‘अड्डा’ गावोगावी होत होता. यामधून ‘संस्कृती’ आणि परंपरा जपली जायची. कष्टकरी, शेतकरी या शर्यतीत हरवून जायचा. त्यावेळी शर्यतींसाठी येणा-या बैलगाड्यांची संख्या मर्यादित होती. बक्षिसाची रक्कम हजारात असायची. बैलगाडी मालक ‘शेतकरी’ असायचे. त्यामुळे शर्यत, शर्यत म्हणून खेळली जायची. मध्यंतरी ‘पेटा’ संस्थेमुळे बैलगाडी शर्यत बंद पडली. प्रकरण न्यायालयात गेले. अथक संर्घषाने बैलगाडी शर्यत सुरू झाली. करोना महामारीत बैलगाडी शर्यतींना ‘ब्रेक’ लागला. लाॅकडाऊननंतर बैलगाडी शर्यतींचे ‘लाॅक’ निघाले. बैलगाडी शर्यतींचा ‘धुरळा’ उडू लागला. पण बंदीनंतरची बैलगाडी शर्यत पूर्णपणे बदलून गेली. काही मूठभर शेतकरी सोडले तर ‘शेठ’ माणसांनी बैलगाडी शर्यत व्यापून टाकली. खरेतर या शेठ मंडळीकडे पाच-पन्नास लाखांची बैले आहेत. बहुतांशी बैले गावाकडची गरीब माणसं सांभाळतात. आता बैलगाडी शर्यतीसाठी ‘लाखां’ची बक्षिसे ठेवली जातात. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. आपल्या बैलाचा चांगला पैरा व्हावा, आपली गाडी गुलालात रहावी यासाठी धडपड सुरू झाली. पै-यासाठी ‘वायदी’ घेतली जावू लागली. त्यामुळे सर्वसामान्य बैलगाडी मालक यात भरडला जावू लागला आहे. पण बैलगाडी शर्यतीमुळे हजारो लोकांच्या व्यवसायांना ‘सुगी’चे दिवस आले. गरिबांच्या चुली पेटू लागल्या. कष्टकरी जगू लागले हे बैलगाडी शर्यतींचे यश आहे. खेळाला व्यवसायाचे स्वरूप आले अलीकडे ‘यू ट्यूब’ चॅनेल चा सुकाळ झाला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यत, बैले यांची माहिती मिळू लागली आहे. लाईव्ह बैलगाडी शर्यत माणूस घरबसल्या मोबाईल अन् टिव्ही वर बघू लागला आहे. बैलगाडी शौकीनांची आपापली आवडली बैले आहेत. त्यातून ‘ट्रोल’चा खेळ सुरू झाला आहे. बैलगाडी शर्यत सातासमुद्रापार गेली आहे. त्याची लोकप्रियता निश्चितपणे वाढली आहे. आता बैलगाडी शर्यत तशी मैदानाबाहेर निकोप राहिली नाही. खेळाला व्यवसायाचे स्वरूप आले आहे. त्या संर्घषातूनच अघटीत घटना घडत आहेत. पण व्यवहारातून एखाद्याचा जीव जावा ही घटना ‘अघटीत’ आहे. त्यामुळे ‘कुटुंब’ उध्वस्त झाले आहे. एखाद्याच्या आयुष्याचा ‘धुरळा’ व्हायला नको बैलगाडी शर्यत कायम सुरू राहिल्या पाहिजेत. पण सर्वसामान्य गाडी मालकांना न्याय मिळाला पाहिजे. गरिबांची ‘बैलं’ उजेडात आली पाहिजेत. शर्यत ही शर्यतीसारखी खेळता आली पाहिजे. स्पर्धा पाहिजे. त्याशिवाय जिंकल्याचा आनंद नाही. या शर्यतीमळे जिंकणारी खोडं प्रकाशात आली. गरिबांच्या बैलांना किंमत आली. एवढे निश्चितपणे झाले आहे. पण बैलं घ्या, बैलं विका पण प्रामाणिकता जपायला हवी. व्यवहार, दिलेला शब्द जपायला हवा. एखाद्याला ‘पोरकं’ करणारी मानसिकता बदलायला हवी. बैलगाडी शर्यतींचा ‘धुरळा’ उडायला हवा. बैलगाडी शौकीनांना आनंद मिळायला हवा. बैलगाडी शर्यत जपायला, जोपासायला पाहिजे. पण मैदानाबाहेरच्या घडामोडींमुळे एखाद्याच्या आयुष्याचा ‘धुरळा’ व्हायला नको.