Onion Price Drop – खटाव तालुक्यातील रब्बी हंगामातील गरवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. रोपे तयार करण्यापासून लागवडीपर्यंत किंवा पेरणी केलेल्या कांद्यापासून कांदा पीक काढेपर्यंत शेतकऱ्याला क्विंटलला सुमारे बाराशे ते पंधराशे खर्च येत असतो. सध्या कांदा पीक काढण्याच्या अवस्थेत असताना खरेदी दरात दिवसाला सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी वर्गात कमालीची नाराजी वाढत आहे. कांद्याच्या खरेदी भावात सातत्याने घसरण होत आहे. आठ दिवसांपूर्वी १७ रुपये किलो दराने जाणारा कांदा आज व्यापारी ९ ते १0 रुपये किलो दराने मागणी व खरेदी करत आहेत. . हजारो एकर क्षेत्रावर असलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून काढलेला कांदा केवळ दराअभावी सडून उकिरड्यावर फेकून द्यायची वेळ येथील शेतकऱ्यांवर येऊ नये. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत होता. मात्र, दरात कमालीची घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर्षी कांद्यांच चांगले उत्पादन होत आहे. कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची योग्य जोपासना केली. मात्र, मातीमोल भावात शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागणार अशी शंका आणि त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. “पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. उत्पादन जास्त व मागणी कमी आणि शासनाची शेतकऱ्यांच्या बाबतची उदासीनता असल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक कमी केले जात आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. असेच चालत राहिल्यास या भागातील कांदा उत्पादक शेतकरी संपुष्टात येईल.” – महेश नलवडे (माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) “शासनाच्या धोरणामुळे शेतमाल दरावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी योग्य यंत्रणा नसल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली आहे. शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून देणे गरजेचे आहे.” – सुधाकर यशवंत फडतरे (कांदा उत्पादक शेतकरी, फडतरवाडी, बुध)