Pune District : गोलेगाव-खराबवाडीतील 373 व्यावसायिक मिळकतींवर बुलडोझर
Pune District : प्राथमिक टप्प्यात व्यावसायिक आणि वाणिज्यिक वापरातील मिळकतींवर कारवाई करण्यात येणार असून, पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात रहिवासी मिळकतींवरही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार बेडसे यांनी सांगितले.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील गोलेगाव आणि खराबवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या 373 व्यावसायिक व वाणिज्यिक मिळकतींवर येत्या दोन दिवसांत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे आणि गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला नायब तहसीलदार राम बीजे, चेतन मोरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार बेडसे म्हणाले की, संबंधित मिळकतधारकांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून 24 तासांच्या आत स्वतःहून बांधकामे आणि साहित्य हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधित मालकांच्या नावे वसूल करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील गोलेगाव आणि खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयाने गायरान जमीन मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही राज्यभरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले असल्याने महसूल प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक टप्प्यात व्यावसायिक आणि वाणिज्यिक वापरातील मिळकतींवर कारवाई करण्यात येणार असून, पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात रहिवासी मिळकतींवरही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार बेडसे यांनी सांगितले.
दरम्यान, या कारवाईमुळे चाकण परिसरातील गोलेगाव आणि खराबवाडी गावांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक व्यावसायिकांचे गाळे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना पाडल्या जाणार असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच खराबवाडी येथील गायरान जागेवरील एका खासगी शाळेच्या इमारतीलाही कारवाईचा फटका बसणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, खराबवाडी येथील दोन एकर गायरान क्षेत्रातील 286, तर गोलेगाव येथील सुमारे 60 आर गायरान क्षेत्रातील 87 अशा एकूण 373 मिळकतींवर कारवाई करण्यात येणार आहे.





