Buldhana Accident : बुलढाण्यात विचित्र अपघात; 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये विचित्र अपघात झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस पुण्याकडून परतवाडाकडे निघाली होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना येऊन जोरात धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे.





