Buldhana Accident : बुलढाण्यात भीषण अपघात; एसटी- टेम्पोची धडक; चौघांचा जागीच मृत्यू, १६ जखमी

बुलढाणा : बुलढाण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खामगाव अकोला ते इंदौर या मध्य प्रदेश परिवहनच्या बसला चुकीच्या दिशेने समोरून आलेल्या टिप्परने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला असून एकूण १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
हा अपघात नांदुरानजिक आंबोडा फाटा जवळ मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये टिप्परचालक पातोड्या मालसिंग भैय्यड्या, प्रेमसिंग धारवे (दोघेही रा. नांगरटी, धानोरा महासिद्ध, ता. जळगाव) तसेच बळीराम कोतवाल यांचा समावेश आहे.
याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बश ही मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची आहे. बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. नागरिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच गंभीर जखमींना अकोला येथे पाठवण्यात आले आहे. जखमींमध्ये खामगाव, अकोला, अमरावती येथील प्रवाशांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनं इतक्या वेगात होती, की त्यांच्यात अतिशय भीषण धडक झाली आणि बससह वाहनाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या धडकेनंतर वाहनांच्या काचा फुटून रस्त्यावर विखुलल्या आणि विटासुद्धा रस्त्यावर पसरल्या आहेत. दरम्यान या अपघातात जखमींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतांची ओळख पटवण्यासाठीचे काम सुरू केलं आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर ट्रक-टेम्पोची जोरदार धडक
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोची (ता. कवठेमहांकाळ) फाट्याजवळ ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर आठ महिला जखमी झाल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोची (ता. कवठेमहांकाळ) येथे ही घटना घडली आहे.
अपघातानंतर ११ महिलांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ८ जणींवर सध्या उपचार सुरू असून ३ महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. भारती कांबळे, रेखा कांबळे, राणी वडर अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. मृत महिला मिरज तालुक्यातील म्हैशाळ या गावातील आहेत. . या भीषण अपघाताने संपूर्ण गाव हादरून गेले असून शोककळा पसरली आहे.





