बुलढाणा : बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नांदुरा शहरात मंगळवारी पहाटे आर्टिगा कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बुलढाण्यातील नांदुरा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली आहे. आर्टिगा कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला होता. त्यामुळे कारमधील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढणे अवघड झाले होते. मात्र, नांदुरा येथील जीवन रक्षक पथकाने दोन तासांची मेहनत करुन गाडीतील जखमी आणि मृतांना बाहेर काढले. भीषण धडकेमुळे कारमधील सर्व प्रवाशी निपचित पडले होते. त्यामुळे जीवन रक्षक पथकाला कारच्या छताचा पत्र्याचा भाग कापावा लागला. हा पत्रा कापल्यानंतर जीवन रक्षक पथकाने कारमध्ये उतरुन मृतांना आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना खामगाव० येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे या अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.