Budget 2025 | प्राप्ती करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळण्याची शक्यता….

नवी दिल्ली – सध्या महागाई जास्त आहे. खासगी क्षेत्राकडून कर्मचार्यांना पगारात वाढ होत नाही. यामुळे मध्यम वर्गाची क्रयशक्ती कमी झाली आहे. ग्राहक वस्तूंची विक्री कमी होऊन कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. या बाबी विचारात घेता प्राप्तिकर दात्यांना आगामी अर्थसंकल्पात बर्याच सवलती मिळण्याची शक्यता वृत्त माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
15 लाखापर्यंतचे उत्पन्न असणार्या करदात्यांना जास्त कर सवलती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होईल. मध्यमवर्ग खर्च वाढवेल. अशी यामागे भूमिका असल्याचे समजले जाते. मात्र 15 लाखापर्यंतचे उत्पन्न असणार्यांना कशा सवलती मिळतील आणि किती दिल्या जातील याचे मूल्यांकन सध्या चालू आहे. त्यामुळे याबाबतची आकडेवारी समोर येत नाही.
भारतात सध्या दोन प्राप्तिकर पद्धती आहेत. जुन्या पद्धतीत कराचे दर जास्त आहेत. मात्र सूट आणि वजावट मिळते. तर नव्या कर पद्धतीत कर कमी आहेत मात्र सूट आणि वजावट मिळत नाही. नव्या कर पद्धतीत जर कर सवलती दिल्या तर नवी कर पद्धत स्वीकारण्याचे प्रमाण वाढेल अशी ही सरकारची यामागे भूमिका आहे.
सध्या कंपनी कर कमी आहे तर प्राप्तिकर जास्त आहे. यामुळे वैयक्तिक पातळीवर नागरिकावर अन्याय होत आहे. महागाईमुळे नागरिकांना त्रास होत आहे अशी टीका होत आहे. जर प्राप्तिकर कमी केला तर यामुळे नागरिकांचे जीवन सुसह्य होईल. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.





