India’s Forex : भारताकडील डॉलरच्या साठ्यात मोठी घट…

मुंबई – निर्यातीपेक्षा आयात कमी झाली असतानाच रिझर्व बँक रुपयाचे मूल्य वाढविण्यासाठी डॉलर खर्च करत आहे. यामुळे भारताकडील परकीय चलन साठ्यात घट होत आहे. 20 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 8.4 अब्ज डॉलरने कमी होऊन 644.3 अब्ज डॉलर या पातळीवर गेला.या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 1.9 अब्ज डॉलरने कमी झाला होता.
रिझर्व बँकेने गेल्या दोन महिन्यात रुपयाला सावरण्यासाठी बरेच परकीय चलन खर्च केले आहे. मात्र तरीही रुपयाचा भाव एकतर्फी कोसळत आहे. अशा परिस्थितीत भारताला आयातीसाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे आयात महागात पडत आहे. त्यामुळे महागाई आयात केल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अर्थ मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय आणि रिझर्व बँक समन्वयाने प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते.
सप्टेंबरमध्ये अमेरिकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केल्यानंतर भारतात कर्ज रोखे आणि शेअर बाजारात बरीच गुंतवणूक झाली होती. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा 704. 5 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यानंतर एकतर्फी परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे.
दरम्यान, या आठवड्यात भारताकडील सोन्याचे मूल्य 2.33 अब्ज डॉलरने कमी होऊन 65.7 अब्ज डॉलर झाले आहे. या कालावधीत जागतिक बाजारात सोन्याचे दर डॉलरमध्ये कमी झाल्यामुळे भारताकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य कमी झाले असल्याचे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताची 4.2 अब्ची डॉलरची ठेव आहे.





