CM फडणवीसांच्या त्या आदेशामुळे भाई नाराज? चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis | Eknath Shinde | राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका आदेशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याच्या फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयावरून नव्या वादाला तोंड फुटलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. याअगोदर ड वर्गाच्या १९ महापालिकेवर बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र, आता या महापालिकेवर आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाली. तसेच नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे. पण आता १९ ड महापालिकेवर देखील सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भाजपच्या माध्यम प्रमुखांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दर तीन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना अधिकार आहेत. माध्यमांनी दिलेल्या या वृत्तावर त्यांनी माध्यमांकडे नाराजी मोजण्याचं यंत्र आलं आहे का? असा सवाल केला. तसेच मनातली नाराजी ही कशी ओळखतात याचं संशोधन झालेलं नाही. हरकत नाही माध्यम म्हणून तुम्हाला तो अधिकार असल्याचं बन म्हणाले. त्यांनी एका न्यूज वाहिनीसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. सार काही आलबेल असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच कॅबिनेट बैठका आदी सर्व निर्णय हे एकमताने एकदिलाने हे तिन्ही नेते घेत असल्याची प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली आहे.
हेही वाचा : Earthquake in Russia | रशियात भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; त्सुनामीचाही धोका





