Earthquake in Russia | रशियात भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; त्सुनामीचाही धोका

Earthquake in Russia | रशियाच्या पूर्वेकडील कमचटका बेटाच्या किनाऱ्याजवळ भूकंपाचे तीव्र झटके बसले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिक्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरने चेतावणी दिली आहे की, भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटर परिसरातील किनारी भागात धोकादायक लाटा येऊ शकतात. सकाळी आलेल्या भूकंपानंतर अमेरिकन सुनामी चेतावणी प्रणालीने सुनामीचा धोका जाहीर केला. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क झाली असून किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच संवेदनशील भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिस्थितीवर बारकाईने लक्ष
दरम्यान, जुलैमध्ये ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप ज्या भागात आला होता आणि ज्यामुळे पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, त्याच भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज झालेल्या भूकंपामुळे संभाव्य त्सुनामीच्या धोक्याच्या दृष्टीने अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अलीकडेच अफगाणिस्तानात ६.० तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. या भूकंपात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले. Earthquake in Russia |
हेही वाचा:
ब्रेकनंतर पुन्हा राज्यात पावसाची एन्ट्री; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता





