पुणे जिल्हा | नीरेतील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली ; दोन वर्षांनंतर नदीला पाणी

नीरा, (वार्ताहर) – वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संतधार पावसामुळे वीर धरण 98 टक्के भरले असून वीर धरणांमधून नीरा नदीपत्रात 55 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नीरा नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नीरा-सातारा दरम्यान नीरा नदीवर असणारा ब्रिटिश कालीन पूल गुरुवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाच वाजता पाण्याखाली गेला. तब्बल दोन वर्षांनंतर नीरा नदीला पाणी आले. त्यामुळे नीरा नदीचा हा पूर पाहण्यासाठी नीरा आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
गेली अनेक दिवस मोठी प्रतीक्षा केल्यानंतर नीरा नदीच्या खोर्यामध्ये पावसाने हजेरी लावली. भोर आणि राजगड (वाल्हे) तालुक्यात डोंगररांगांवर मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे नीरा नदी प्रणालीतीमध्ये असलेल्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
सकाळी वीर धरण 98 टक्के भरले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वीर धरणांमधून नीरा नदी पत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले. सकाळी 11च्या सुमारास 4 हजार क्युसेकने यानंतर त्यात वाढ करून 13 हजार क्युसेकने पुन्हा दुपारी साडेबारोच्या सुमारास 32 हजार तर दुपारी आडीच वाजता 55 हजार क्युसेकने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले. अत्यंत कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली.
सात वर्षांपूर्वीच्या आठवणी जागा
भोर आणि राजगड (वेल्हे) या तालुक्यात पावसाचे प्रमाण असेच राहिले तर नीरा नदीला आणखी पाणी सोडावे लागेल आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सात वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नीरा नदी पत्रामध्ये 70 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते.
धरणांतील पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
भाटघर : 70.88
नीरा देवघर : 67.91
वीर : 97.88
गुंजवणी : 72





