Nagar | कडूस – पाडळी रांजणगाव रस्त्यावरील पूल धोकादायक

पारनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील दोन्ही तालुक्यांना जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कडूस- पाडळी रांजणगाव रस्त्यावरील कॅनलचा पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कडूसचे सरपंच मनोजकुमार मुंगसे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
कडूस ते पाडळी रांजणगाव रस्त्यावरील पाटबंधारे विभागाच्या कॅनलचे कठडे असलेले लोखंडी पाईप तुटलेल्या अवस्थेत असून संरक्षण भिंत तुटली असल्यामुळे वाहनांना प्रवास करताना धोका निर्माण झाला आहे. हा पूल कडूस, भोयरे गांगर्डा, सारोळा सोमवंशी, चांभुर्डी ते पाडळी रांजणगाव व देवदैठणला जोडणारा असून या रस्त्यावर सतत अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्ता देखील खचला आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पूल अनेक दिवसांपासून धोकादायक बनला आहे. याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. अरूंद असलेल्या पुलाचे कठडे दुरूस्त करून पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी सरपंच मनोज मुंगसे यांनी केली आहे.





