ब्रेकिंग! अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा ‘या’ कारणामुळे रद्द; चर्चांना उधाण

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला होता. गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (Marathwada Sahitya Sammelan) उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. परंतु आता अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगरमधील दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर आले आहे. आज 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार होते. तसेच आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकास कामांचा उद्घाटनाचा आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या या दौऱ्याप्रकरणी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हटले निवेदनात?
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास अजित पवारांसह सर्वच राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. याबाबत, गंगापूर तहसीलदार यांना मराठा आंदोलकांनी निवेदन दिले होते. आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्या ठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतः चा प्रचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आसताना शासनाने अजून ही मराठा समाजाला OBCमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये अशी घोषणा केली आहे.
मात्र तसे न करता कोणीतरी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून प्रचारासाठी साहित्य संमेलनाच्या वापर करत असेल तर आमचा सकल मराठा समाजाचा यास विरोध आहे. शांततेत लोकशाही मार्गाने आम्ही राजकीय पुढाऱ्यांना विरोध करत आहोत, तरी प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा विचार करता राजकीय मंडळीना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करावा, अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदार असतील.





